नवी दिल्ली | दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांची नियुक्ती केल्याने विधानसभेत भाजपावर टीका करताना आम आदमी पक्षाने कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. जावई तुरुंगात जातील तेव्हा केंद्रातील सरकार पडेल, असे आपने म्हटले आहे. देशात भाजपाविरोधात विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसमधील घराणेशाहीचा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचे उद्योग अडचणी वाढवणार अशी चर्चा होत आहे.
सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. याविरोधात दिल्ली सरकारने विधानसभेत प्रस्ताव पारित केला. यावेळी आपचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, राकेश अस्थाना यांनी सीबीआय प्रमुख असताना एका पक्षाच्या जावयावर कारवाई केली.
परंतू सर्वजणांना माहिती आहे की या जावयावर काय आणि किती कारवाई झाली. भाजपा आणि काँग्रेसची आतून सेटिंग आहे. ज्या दिवशी हे जावई तुरुंगात जातील, त्याचा आधीच भाजपाची सरकार पडेल असा टोला आपने लगावला आहे.