नितीश सरकारला पहिलाच मोठा धक्का ; शिक्षण मंत्र्याचा राजीनामा 

पटना: बिहारमध्ये  विधानसभा निवडणुकामध्ये तेथील जनतेने पुन्हा एकदा एनएडीएला संधी दिली. तीनच दिवसांपूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला. मात्र, आता अवघ्या तीनच दिवसात बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी  आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा  दिला आहे.

शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी  यांनी आजच (गुरुवार) आपला पदभार हाती घेतला होता. मात्र, अवघ्या काही तासातच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भष्ट्राचाराच्या आरोपावरुन गेले दोन दिवस विरोधी पक्ष सातत्याने मंत्री मेवालाल यांच्यावर निशाणा साधत होता. यामुळे वाढता दबाव लक्षात घेता त्यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी शिक्षणमंत्री चौधरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे कालपासून असा अंदाज वर्तवला जात होता की, मेवालाल यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात येईल.

तत्पूर्वी, मेवालालाल चौधरी यांनी विरोधकांद्वारे आपल्यावर लादल्या गेलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, दोषारोपपत्र दाखल केले जाते तेव्हाच आरोप सिद्ध होतात किंवा कोर्टाने यावर आदेश देतं. पण आरोप सिद्ध करण्यासाठी यापैकी काहीही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मेवालाल चौधरी यांनी आज आपल्या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांना फारच कष्ट पडत असल्याचे जाणवले. भष्ट्राचाराच्या आरोपाबाबत त्यांनी आपली बाजू मांडली पण त्यावर उत्तरं देताना ते अडखळत असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाताना मेवालाल यांनी नितीशकुमार यांची भेट घेतली. असे म्हटले जात आहे की नितीशकुमार यांनी मेवालाल यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर मेवालाल यांनी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता कार्यभार स्वीकारला आणि दुपारी अडीचपर्यंत राजीनामाही दिला. राज्यपाल फागु चौहान यांनी मेवालाल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले अशोक चौधरी यांना सध्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. अशोक चौधरी यांनी यापूर्वी शिक्षण विभागही सांभाळला आहे.

नेमके काय आरोप आहेत? 

बिहारमध्ये एनडीएचे (NDA) सरकार स्थापनेपासूनच  विरोधी पक्ष राजद (RJD) आणि कॉंग्रेस (Congress)ने मेवालाल चौधरी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेडीयूचे नेते मेवालाल चौधरी यांच्यावर २०१७ साली भागलपूर साबूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदावर असताना भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर असा आरोप आहे की, कुलगुरू असताना त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून १६१ सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ शास्त्रज्ञांची नेमणूक केली होती. याशिवाय सबौर कृषी विद्यापीठ परिसरातील इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मेवालाल यांच्याविरोधात २०१७ मध्ये चौकशी सुरू केली गेली होती, ज्यामध्ये त्याच्यावरील आरोप योग्य असल्याचे दिसून आले होते. मात्र, चौधरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. गुरुवारी राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना देखील म्हटलं की, हे आरोप खोटे आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: