गंगेतील मृतदेहांचा खच अजेंड्याचाच भाग; RSS ची माध्यमांवर जोरदार टीका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढून मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात दररोज चार ते पाच हजार कोरोना रुग्णमृत्यूची नोंद होताना दिसत आहे. याच काळात बिहार आणि उत्तर प्रदेशात गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगाताना दिसू लागले. यावरून राजकारण प्रचंड तापले होते. याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी आणि योगी सरकारवर विरोधकांनी टीका केली. मात्र, यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका मांडताना माध्यमांवर आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, गंगेत सापडलेल्या मृतदेहावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांचे प्रसारमाध्यमांनी केलेले वार्तांकन हा अजेंड्याचाच भाग होता, असा आरोप त्यांनी केला.

महर्षी नारद जयंतीनिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र कुमार म्हणाले, ‘गंगेमध्ये २०१५ आणि २०१७ मध्येही मृतदेह आढळून आले होते. त्यावेळी तर करोनाची महामारी नव्हती. त्यामुळे आता आढळून येणाऱ्या मृतदेहांचा संबंध करोनाशी जोडणं हा अजेंड्याचाच भाग आहे, हे स्पष्ट दिसतंय,’ असे नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. आता नरेंद्र कुमार याच्या या विधानावर विरोधक काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: