अयोध्या | एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करून ४० आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केले तर दुसरीकडे कधीकधी उद्धव ठाकेचे शिलेदार राहिलेली माजी मंत्री रामदास कदम यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता मात्र शिंदे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर वेळोवेळी निशाणा साधला होता.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत अयोध्या दौऱ्यावर गेलेले शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्येकडे रवाना झाले. मात्र रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून राज्यात शिवशाही आणण्यासाठी रामचंद्राचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अयोध्येला जात आहोत, असे कदम म्हणाले.
रामदास कदम म्हणाले, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंना उध्वस्त करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती लाभावी, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात पुन्हा यावी. तसेच बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून व्हावे म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत.
पुढे बोलताना कदम म्हणाले की, चोर कोण आणि साव कोण याचा फैसला लवकरच होणार आहे. तेव्हा लवकरच दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. आमच्या आमदारक्या कोणी चोरल्या, नेत्यांची मंत्रिपदे कोणी चोरली ते मातोश्रीमध्येच बसलेले आहेत. सर्वकाही लवकरच कळेल, त्यांची अर्थात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची टीका म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली हज को चली अशी आहे. त्यांची स्थिती म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल, अशी झाली आहे असं म्हणत टोला लगावला आहे.