मुंबई | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्पुरते पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले आहे. आता पक्षाच्या उभारणीसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार मैदानात उतरले आहेत. यासोबतच आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पोटनिवडणुकीला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
जनतेच्या मनात ठाकरे हे नाव घर करून आहे. गद्दार पार्टीने कितीही नीच प्रयत्न केले, आम्ही दिलेली नावे घेण्याचा प्रयत्न केला तरी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसला जाणार नाही आणि खोक्यांनी तो विकतही घेता येणार नाही. पक्षावर दावा ठोकणारे कागदपत्र सादर केल्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगाने अंतरिम निर्णय घेणं हे एकतर्फी वर्तन आहे. मात्र असे असले तरी आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, ज्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षावर घाईने निर्णय देण्यात आला, त्याच निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसने आज जाहीर पाठिंबा दर्शवला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विनायक राऊत हेदेखील उपस्थित होते.