आघाडी सरकारच्या काळात गाजलेलं तीस-तीस घोटाळ्यावरून ठाकरे गटाची चिंता वाढू शकते. कारण बड्या-बड्या लोकांची नावे असलेल्या तीस-तीस घोटाळ्यात आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव समोर पुढे आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची ‘ईडी’ने माहिती मागवली आहे.
या घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड याच्याकडून पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या आमदार, त्यांचे नातेवाईक, पोलिस अधिकारी, शिक्षक, उद्योजकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे यांनी मात्र `डायरीत माझं नाव नाही,कोणी दुसरा दानवे असेल.’ असा खुलास करत हा घोटाळा काय आहे? यात माझे नाव कुठून आले, या संदर्भात मला काहीच माहित नाही, असे म्हटले आहे.या घोटाळ्यामध्ये अनेक लोकांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. ३०-३० योजनेच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा देतो, असे अमिष दाखवण्यात आले होते.
सुरुवातीला काही शेतकऱ्यांना परतावाही मिळाला. त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढत गेल्यानंतर संतोष राठोड आणि त्याच्या एजंटांनी अचानक हात वर केले. हजारो शेतकऱ्यांनी या योजनेत पैसे गुंतवले असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील या योजनेत पैसे गुंतवूण फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे.