तर तुम्ही पंतप्रधान मोदींना अटक करणार का? केजरीवाल यांचं CBI ला आवाहन

 

नवी दिल्ली | दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सडकून टीका केली. सीबीआयने शुक्रवारी केजरीवाल यांना समन्स बजावले असून 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षभरापासून भाजप दिल्लीमध्ये मद्य धोरणात घोटाळा झाल्याचा आरडाओरडा करत असून देशातील तपास यंत्रणा त्यांच्या तालावर नाचून घोटाळ्याची चौकशी करत आहेत. परंतु मद्य धोरणामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय आणि ईडीला फटकारले. तपास यंत्रणांनी न्यायालयाची दिशाभूल केली असून सिसोदिया यांना दोषी ठरवण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यातील कनेक्शनबाबत थेट प्रश्न विचारले होते. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असून केजरीवाल यांच्या अटकेचे षड्यंत्र रचले गेले आहे, असा गंभीर आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची अशी कितीही भीती दाखवली तरी केजरीवाल घाबरणारे नाहीत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या मुद्द्यांवर ते यापुढेही आवाज उठवत राहतील, असे सिंह यांनी ठणकावून सांगितले.

Team Global News Marathi: