धक्कादायक: देशात चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल साडेचार हजार मृत्यू तर 2 लाख 67 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णसंख्येत ट होताना दिसत आहे. पण मृतांचा आकडा मात्र चिंता वाढवत आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज ४ हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह असून, देशात एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यू संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्र, दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोना परिस्थिती बिकट बनली आहे.

कोरोना आणि कोरोनानंतर उद्भवणाऱ्या व्याधींमुळे देशात मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत. देशात कोरोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी झोप उडवणारी आहे.यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात ३० हजार आणि तामिळनाडूत ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

काय आहे राज्यांची स्थिती

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मंगळवारी २८ हजार ४३८ नवे कोरोना रुग्ण आढळले. जे सोमवारी सापडलेल्या नव्या रुग्णांच्या तुलनेने १ हजार ८२२ इतके कमी होते. तर कोरोनामुळे राज्यात ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानुसार, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५४ लाख ३३ हजार ५०६ झाली आहे. त्यापैकी ८३ हजार ७७७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. विभागानुसार, महाराष्ट्रात सोमवारी २६ हजार ६१६ नवे रुग्ण सापडले होते. तर ५१६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार ६७९ मृत्यूपैकी ४२२ जणांचा मृत्यू मागील ४८ तासात तर २५७ जणांचा मृत्यू मागील आठवड्यात झाला आहे.

तमिळनाडू

या राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण ३३ हजार ०५९ सापडले तर ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे. तमिळनाडू राज्यात एकूण १६ लाख ६४ हजार ३५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या १८ हजार ३६९ वर पोहचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी २१ हजार ३६२ रुग्णांनी कोरोनाला मात दिली. या आकड्यानुसार आतापर्यंत १४ लाख ०३ हजार ०५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील २ लाख ४२ हजार ९२९ जणांवर उपचार चालू आहेत. चेन्नई मध्ये नवीन ६०१६ कोरोना रुग्ण आढळले. या आकड्यानुसार, राजधानी चेन्नईत कोरोना बाधितांची संख्या ४ लाख ५० हजार २६७ झाली आहे. तर ५ हजार ९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी कोविड-१९ चे १९ हजार ४२८ नवीन रुग्ण सापडले तर यादरम्यान कोरोना व्हायरसमुळे १४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, १९ हजार ४२८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून या संख्येनुसार राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ११ लाख ७१ हजार ८६१ झाली आहे. तर आतापर्यत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या १३ हजार ५७६ झाली आहे.

कर्नाटक

कर्नाटकात मागील २४ तासात ३० हजार ३०९ नवीन कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर ५२५ जणांचा मृत्यू झाला. या २४ तासात ५८ हजार ३९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वालाख मृत्यूंची नोंद

‘दैनिक भास्कर’च्या गुजराती दैनिकाने गुजरातमधील मृतांच्या आकडेवारीबद्दल विशेष वृत्त प्रसिद्ध केलं आहे. १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या कालावधी राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे. ३३ जिल्हे आणि ८ महापालिकांद्वारे ७१ दिवसांमध्ये १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ ४ हजार २१८ जणांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: