धक्कादायक..! मुंबई महानगरपालिकेकडून 1,300 इमारती सील
मुंबई (प्रतिनिधी)-
राज्याची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट दाटून आलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत, अशी माहिती स्वत: महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी आता शिस्त पाळली नाही तर कठीण परिस्थिती उद्भवेल, असा इशारा महापौरांनी दिला आहे
मुंबईत कोरोना प्रचंड वेगाने फोफावत चाललाय. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. मात्र, या परिस्थितीतही न डगमगता प्रशासन सतर्क झालं आहे. महापालिका प्रशासनाने मिशन झिरो मोहिम सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
ए वाॅर्डमधील २८, बी वाॅर्डमधील १५, सी वाॅर्डमधील ५, डी वाॅर्डमधील १०१, ई वाॅर्डमधील २४, एफएस वाॅर्डमधील १२, जीएनवाॅर्डमधील ७, एचईवाॅर्डमधील ५५, एचडब्लू वाॅर्डमधील ९७, केई वाॅर्डमधील २३, केडब्ल्यू वाॅर्डमधील ७४, एल वाॅर्डमधील १, एमडब्ल्यू वाॅर्डमधील १०५, एन वाॅर्डमधील १२५, पीएनवाॅर्डमधील ७, पीएस वाॅर्डमधील १२५, आरसी वाॅर्डमधील १०६, आरएन वाॅर्डमधील १२, आरएस वाॅर्डमधील ९०, एस वाॅर्डमधील ३३, टी वाॅर्डमधील २३३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
“मुंबईकरांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळावं. मास्क न वापरणाऱ्यांवर 2, 5 आणि 10 हजारांचा दंड ठोठावला तर त्यांना शिस्त लागेल. शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी क्लिन मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. या क्लिन मार्शला विरोध करणे चुकीचे आहे. क्लिन मार्शल यांना कारवाई करण्यासाठी पोलिसांनी देखील सहकार्य करावे”, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.