मुंबई | शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने याबाबत संकेत देण्यात आले आहे. आज दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एक पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
या पत्रकार परिषदेत या आघाडीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे. या युतीबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी यांनी देखील भाष्य केले. आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे, असे ते म्हणाले.माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू, असे विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
आंबेडकर म्हणाले की, वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ,असे विधान आंबेडकर यांनी केले आहे.