मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही. आमच्यासारखे कार्यकर्ते आहे. संजय राऊतसुद्धा पुरेसे आहेत असा चिमटा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना काढला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडील राहिलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदार स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील. पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील? असा सवाल त्यांनी विचारला.
उद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरतं जवळ येतील आणि त्यानंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आलेत. भाजपा-शिंदे गट आणि अजून कुणी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्यप्रकारे न्याय देणे, सन्मान देणे हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना जमते. ते उद्धव ठाकरेंना जमत नाही. ते कधीच युतीला न्याय देऊ शकत नाहीत असं बावनकुळे यांनी सांगितले.