शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून वाद सुरू आहे. याबाबत आज, सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगात अंतिम सुनावणी होणार असून निर्णय जाहीर होणार असल्याचे समजते. याआधी २० जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना २३ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
तसेच याबाबतची पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे 23 जानेवारी याच दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुखपदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सध्याचे वातावरण, अनेक नेत्यांची देहबोली आणि अतिआत्मविश्वास पाहता लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा निकाल आपल्याविरोधात गेल्यास “प्लॅन बी’च्या तयारी असल्याचे दिसून येत आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई कशी देता येईल यासाठी तयारी केली जात असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात नुकत्याच एका कार्यक्रमात आपल्यासारख्या ज्वलंत निखाऱ्यांनीच मशाल पेटणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात असून निवडणूक आयोगाचा निकाल जर विरोधात गेल्यास ठाकरे गटाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी करण्यात येत आहे.