महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान करणारे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीवर केले. ‘त्याकाळात राजकीय अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक लोपं माफीनामा लिहायचे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पाचवेळा अशी पत्र लिहिली होती,’ असे संतापजनक वक्तव्य करून सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेलाच डागण्या दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्याचा विडाच जणू भाजपच्या नेत्यांनी उचलला आहे असे चित्र दिसते. संभाजीनगर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुनेपुराणे आदर्श झाले, असे उद्गार काढले. त्यामुळे संतापाची लाट पसरलेली असताना भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आज तक’ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी त्रिवेदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिवरायांबद्दल विखारी उद्गार काढले. सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान करण्याचे धाडस भाजपचे नेते कसे करू शकतात, असा सवाल शिवप्रेमी करीत आहेत.