राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त विधान केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे विधान करून राज्यपालांनी नवा वाद ओढवला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात कोश्यारी बोलत होते.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आले. राज्यपालांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही.
महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असेही वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टिका केली. छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात आहेत. महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल, असे शिंदे राज्यपाल कोश्यारी यांना उद्देशून म्हणाले.