महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून एकीकडे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, अशी सूचक प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. आता संभाजी राजे यांच्या या प्रतिक्रियेमुळे नव्या चर्चाना उधाण आले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. पण जर मला उमेदवारी शिवसेनेने दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती असे मत छत्रपती संभाजीराजे आणि व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज विश्रांतवाडीमध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते.
अहमदनगरमध्ये बोलतानाही त्यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.