एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. विधानसभेत बहुमत चाचणी होण्यापूर्वीच उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यात मंगळवारी ९ ऑगस्टला महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली. त्यात भाजपाकडून ९ आणि शिंदे गटाकडून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं नाव पुढे येते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी असणारे मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीला २४ तास उलटत नाहीत तोवर मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरेंची भाजपा नेत्यांसोबत जवळीक वाढली असून मनसे-भाजपा एकत्र येण्याच्याही चर्चा आहेत.