शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोऱ्हाळे बु. स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दि माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब ताव आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेने रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी. या भरतीमध्ये जिल्ह्यातील गरजू मुला-मुलींना गुणवत्तेनुसार संधी मिळणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज देत आहे. नाबार्डची परवानगी घेऊन कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोऱ्हाळे बु. शाखा साडेतीन कोटी रुपये नफ्यामध्ये असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बॅंकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करून ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बँकेत लॉकरच्या सुविधेसोबत सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे, असेही अजितदादा यांनी सांगितले. फक्त ऊस लागवड करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता पाहूनच पिके घ्यावीत असा सल्ला सुद्धा शेतकऱ्यांना दिला होता.