नाशिक | नाशिक पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडत असून आता सत्यजित तांबे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध असल्याची माहिती शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांची एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेरच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे याना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता पुत्रांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली.
अशातच आता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने देखील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणीत तर वाढ झालीच आहे, शिवाय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक पदवीधर निवडणूक मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले की, सुधीर तांबे उमेदवार असते, तर मदत केली असती. मात्र सुधीर तांबे उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांना पाठिंबा नाही. त्यामुळे इतर समर्थक पर्यायाचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
त्याचबरोबर सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याने विरोध होत आहे. टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज होणार प्राथमिक बैठक होणार असून 16 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शिवाय सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार आहे हे ओपन सिक्रेट असून सत्यजित तांबे बंडखोर उमेदवार असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक सेनेने केला आहे. तसेच पदवीधर मतदार संघ हा कुणाचा सातबारा नाही, की बापानंतर मुलाने निवडणुकीला उभे राहावे, असा सणसणीत टोलाही यावेळी चव्हाण यांनी लगावला आहे.