तांबे हे निष्ठावंत घराणे आहे. त्यावर काही बोलत येणार नाही. तांबे यांच्या चुकीला तेच जबाबदार आहे. पण जे घडलं त्याबद्दल महाविकास विकास आघाडीमध्ये समन्वय असला पाहिजे, पुढील लढ्या लढायच्या असेल तर समन्वय असला पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. ‘नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोंधळ उडाला. याच मुद्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. ज्या पद्धतीने सरकार चालवलं, त्याच पद्धतीने आता विरोधी पक्षनेते असताना तोच समन्वय आणि एकोपा सुद्धा असला पाहिजे. तरच आपण पुढल्या लढ्या एकत्र लढू शकतो. विधान परिषदेत जो गोंधळ झाला, तो नाकारता येणार नाही. काँग्रेसमध्ये गोंधळ झाला असला तरी तो महाविकास आघाडी म्हणूनच पाहिला पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या जागांबद्दल एकत्रित बसून चर्चा व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. मी कुणाला दोष देत नाही. नागपूर आणि नाशिकच्या जागेबद्दल काळजी पूर्वक निर्णय घेण्याची गरज होती, नाशिकचा घोळ झाला, त्याबद्दल कुणालाही दोष देता येत नाही. तांबे कुटुंब हे निष्ठावंत कुटुंब आहे. त्यावर अविश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असंही राऊत म्हणाले.