कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा भारतीय जनता पक्षासह मनसेने केला होता आहे. पण पहिल्यांदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुराव्यांसहित हा कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळी अकरा वाजता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मुंबईतील विद्याधर हॉलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेत स्क्रीन लावण्यात येणार आहे आणि या स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत. आता नेमका संदीप देशपांडे यांचा निशाणा कोणावर असणार आहे? या पुराव्यांमध्ये नेमकं काय असणार आहे आणि या पुराव्यानंतर आरोप झालेल्या लोकांवर कारवाई होणार का? हे पाहावं लागणार असून मुंबई मनपाच्या निवडणूक आधी सत्ताधारी पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.
या पत्रकार परिषदेबाबत मनसे संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. भेटू सकाळी 11 वाजता असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. सोबतच एक फोटो शेअर केला आहे. त्यावर “कोरोनाव्हायरस स्कॅम… विरप्पन गँगचा सर्वात मोठा घोटाळा! मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची पुराव्यासकट पत्रकार परिषद,” असं लिहिलं आहे.
दरम्यान, संदीप देशपांडी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेतील घोटाळा पुराव्यांसह उघड करणार असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “तीन दिवसांपूर्वी आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेला. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आहे. हे सगळं सोमवारी जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे, या पेन ड्राईव्हमध्ये मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं होतं.