रशियाच्या मध्यस्थीने थांबली आर्मेनिया-अझरबैजानची लढाई

नवी दिल्ली: एके काळी सोविएत रशियाचा  भाग असलेल्या आर्मेनिया आणि अझरबैजान  यांच्यातील लढाई थांबवण्यासाठी रशियाने  मध्यस्थी केली. रशियाचे दोन हजार शांतीसैनिक लढाईचे कारण ठरलेल्या नागोर्नो-काराबाखच्या  संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात चर्चेच्या माध्यमातून नागोर्नो-काराबाखचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू आहेत.

आर्मेनियाच्या २ हजार ३१७ जणांचा मृत्यू

लढाईत आर्मेनियाच्या २ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला. तसेच काही अज्ञातांचेही मृतदेह युद्धभूमीवर पडले आहेत. आर्मेनियाचे आरोग्य मंत्रालय तज्ज्ञांच्या मदतीने प्रत्येक मृतदेहाची ओळख पटवून तो संबंधितांच्या नातलगांच्या ताब्यात देत आहे.

रशियाच्या मध्यस्थीमुळे टळली आर्मेनियाची मोठी हानी

अझरबैजानने युद्धात मोठा दणका दिल्यामुळे आर्मेनियाची अवस्था बिकट झाली होती. मात्र रशियाने मध्यस्थी केल्यामुळे आर्मेनियापुढील मोठ्या हानीचे संकट टळल्याची चर्चा आहे. नागोर्नो-काराबाखमध्ये रशियाचे सैनिक आल्यामुळे सोविएत रशियाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी नऊ देशांच्या हद्दीत रशियाच्या सैनिकांचे तळ स्थापन झाले आहेत. यात आता आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील वादाचे कारण ठरलेल्या नागोर्नो-काराबाखचा समावेश झाला आहे.

४ हजार ४०० चौरस किलोमीटरच्या नागोर्नो-काराबाखचा इतिहास

अझरबैजान हा देश कॅस्पिअन समुद्राच्या  किनाऱ्यावर आहे. तर आर्मेनिया हा देश अझरबैजानचा शेजारी देश आहे. दोन्ही देश ४ हजार ४०० चौरस किलोमीटर परिसरातील नागोर्नो-काराबाख  या भूभागावर दावा करत आहेत. आंतरराष्ट्रीय नकाशानुसार नागोर्नो-काराबाख अझरबैजानच्या हद्दीत आहे, मात्र या भूभागावर आर्मेनियातील स्थानिक सशस्त्र गटांनी ताबा मिळवल्यानंतर वाद सुरू झाला. याआधी १९९१ मध्ये स्थानिक सशस्त्र गटांनी नागोर्नो-काराबाख अझरबैजान पासून स्वतंत्र झाल्याची आणि आर्मेनियात विलीन झाल्याची घोषणा केली होती.

अझरबैजानने स्वातंत्र्याची ही घोषणा फेटाळत नागोर्नो-काराबाख आपलाच भूभाग असल्याचा दावा केला होता. याच मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये अधूनमधून संघर्ष होतात. पण यावेळी तीव्र संघर्ष झाला. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात २७ सप्टेंबर पासून लढाई सुरू होती. अखेर रशियाने नोव्हेंबर महिन्यात ही लढाई थांबवली.

नागोर्नो-काराबाखवरुन अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात २०व्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून आतापर्यंत झालेल्या सर्व संघर्षांमध्ये मिळून दोन्ही देशांचे एकूण ३० हजारांपेक्षा जास्त सामान्य नागरिक ठार झाले. जखमींची संख्या मोठी आहे. लढायांमुळे दोन्ही देशांची प्रचंड वित्तहानी झाली.

आर्मेनियात पंतप्रधान निकोल पशिनयान यांच्यावर नागरिक नाराज

लढाईत झालेल्या प्रचंड हानीमुळे आर्मेनियातील नागरिक पंतप्रधान निकोल पशिनयान  यांच्यावर नाराज झाले आहेत. मागील काही दिवसांपासून पंतप्रधान निकोल पशिनयान  यांच्याविरोधात आर्मेनियात आंदोलने जोर धरत आहेत. देशांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. या परिस्थितीचा नेमका कशा प्रकारे स्फोट होईल याचा अंदाज घेण्यासाठी पंतप्रधान निकोल पशिनयान  यांनी देशाच्या गुप्तचर यंत्रणेला सक्रीय केले आहे. पंतप्रधान आणि मंत्री यांच्या संरक्षण व्यवस्थेला सतर्क राहण्याचे इशारे गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: