दिलासादायक:देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्केवर तर मृत्युदर ही 1.93 टक्केवर

ग्लोबल न्यूज – भारतात मागील 24 तासांत 63 हजार 489 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली असून मृतांची संख्या 50 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 25 लाख 89 हजार 682 एवढी झाली असून त्यापैकी सध्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 18 लाख 62 हजार 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 944 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 49,980 इतकी झाली आहे.

भारतातील मृत्यूची टक्केवारी 2 टक्क्यापेक्षा कमी असून देशात 156 दिवसात 50 हजार मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत 23 दिवसात 50 हजार रुग्ण दगावले होते तर ब्राझील मध्ये 95 व मेक्सिको मध्ये 141 दिवसात 50 हजार मृत्यूंची नोंद झाली होती. वाढल्याले चाचण्यांचे प्रमाण तसेच वेळेवर निदान करून योग्य उपचार व होम आयसोलेशन यासारख्या उपायांमुळे देशातील मृत्यू दर कमी असल्याचे केंद्र सरकारने म्हंटले आहे.

देशात आजवर 2 कोटी 93 लाख 09 हजार 703 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 7 लाख 46 हजार 608 नमूणे हे शनिवारी (दि.15) रोजी तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून काल दिवसभरात 53 हजार 322 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 72 टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूदर 1.93 टक्के आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशात तीन लसीची वेगवेगळ्या स्तरांवर चाचणी सुरू असल्याचे सांगितले. देशातील वैज्ञानिक संपूर्ण निष्ठा आणि एकाग्रतेने लस निर्माण करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्याकडून एकदा ग्रीन सिग्नल मिळाला की मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करून देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची सगळी व्यवस्था व रूपरेषा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: