नगर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक शीतयुद्ध पेटलेले दिसून येत असताना आता नगर पंचायतीच्या निकालात पुन्हा एकदा आघाडीने बाजी मारली असून नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादी पक्षाने १७ पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं १२, काँग्रेसनं ३ तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत.
आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला १७ पैकी १२ जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला होता. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली केली होती.