केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे पाठोपाठ राष्ट्रवादीला मोठा धक्का देत राष्ट्रवादीच राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.राजकीय वर्तुळातून देखील आता याबाबत प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. पक्षाचा गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा परत आणू अशी प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी दिली आहे. निवडणुका येतात आणि जाताच त्यानंतर ही परिस्थिती बदलत असते असंही पाटील म्हणाले. तसेच केंद्रीय समिती याबाबत पुढील निर्णय घेईल असा सूतोवाच देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला.
राष्ट्रीय दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत सुनावणी सुरु होती त्यात आम्ही बाजू मंडळी होती मात्र आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.त्यांनी कोणत्या निकषामध्ये हा निर्णय दिला आहे ते पहावे लागेल. कारण प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस झाली तर राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवू शकतो असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील किंवा नियम पूर्ण केला नसेल म्हणून त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला असेल. मी तर दिवसभरात प्रवासात होतो. शेतकऱ्यांच्या शेतात चाललो आहे. मला माध्यमांकडूनच हे कळालं.” “राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतं घ्यावी लागतात. त्यांनी ते नियम पाळले नसतील किंवा त्यात ते कमी पडले असतील. म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली असेल,” असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केले आहे.