मुंबई | बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बुधवारी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता राज्यभरात पहायला मिळत आहे.
आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत यासाठी मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली आणि अखेर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला, असं भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
मराठी पाट्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि मनसैनिकानांच आहे. यावरून राजसाहेबांनी याबाबतीत केलेले आंदोलन ही त्यांची दूरदृष्टी होती, हे मान्य केलेच पाहिजे, आता सगळ्याच दुकानांच्या पाट्या मराठीत दिसतील, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.