मुंबई | उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून पोलिसांनी अटक केलीहोती . दोघांना मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पोर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तसेच पैसा पुरवत असल्याचे समोर आले होते.
फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत.
याचदरम्यान पोलिसांनी देखील एक महत्वाची माहिती दिली आहे. सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची देखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते आहे.