टीम इंडियाला धक्का, कृणाल पांड्यापाठोपाठ आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात नुकतीच एक दिवसीय आणि टी-20 मालिका खेळली गेली. एक दिवसीय मालिका हिंदुस्थानने 2-1 तर टी-20 मालिका श्रीलंकेने 2-1 अशी जिंकली. मात्र दुसरा टी-20 सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आता पांड्यापाठोपाठ फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कृणाल पांड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दुसरा टी-20 सामना एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला होता. तसेच टीम इंडियाच्या आठ खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले होते. युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम हे दोघेही आयसोलेट होते. या दोघांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र दुसऱ्या चाचणीत दोघेही पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे पांड्यासोबत या दोघांनाही श्रीलंकेतच थांबावे लागणार असून इतर खेळाडू हिंदुस्थानकडे रवानी होतील.

 

नवख्या खेळाडूंसह खेळावा लागला सामना

पांड्याला कोरोनाची लागण झाल्याने आणि 8 प्रमुख खेळाडू आयसोलेट झाल्याने हिंदुस्थानच्या संघाला नवख्या खेळाडूंसह दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खेळावा लागला होता. याचा फायदा घेत श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकत मालिकाही आपल्या नावे केली.

 

एक दिवसीय मालिकाही पुढे ढकलली होती

दरम्यान, एक दिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे ही मालिका 5 दिवस पुढे ढकलण्यात आली होती. मात्र या मालिकेत हिंदुस्थानच्या नवख्या संघाने चांगली कामगिरी करत यजमान संघाचा पराभव केला होता.

श्रीलंका दौऱ्यातील खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण झाली होती. युरो फुटबॉल स्पर्धेचा सामना पाहणे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या अंगाशी आले होते आणि त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आल्याने ऋद्धिमान सहा, अभिमन्यू इश्वरन आणि भरत अरुण हे देखील आयसोलेट होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: