पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागणी केली आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील पुण्याच्या नामांतरावरून भाष्य केले आहे.
आज पिंपरी-चिंचवडमध्ये आले असताना माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पुणे हे मिनी इंडिया आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला पाहिजे. उगाच बाहेरच्यांनी सल्ले देऊ नये, सल्ले दिल्याने अडचणी ठरतात. कुणाबद्दलही अनादर होणार नाही, अशी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावे चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असताना राज्यात नवीन नवीन प्रस्ताव पुढे येत आहेत. त्यामुळे याबाबत बोलणे आमच्यासारख्या राजकीय नेत्याला अवघड जाते. आता सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून, विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडला पुण्याचाच भाग समजला जातो. माझी विनंती आहे की, महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि बाकी विषय भरकटवायचे याबाबत सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे, असे ते स्पष्ट म्हणाले.