पुणेकरांनो नियमांचे पालन करा; मास्क वापरा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका:-प्रकाश जावडेकर

पुणे, ५ सप्टेंबर : पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसंच पुण्यातील कोरोना संदर्भात 3 बैठका झाल्या असून यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे-पाटील तसंच संबंधित अनेक अधिकारी उपस्थित होते.

या बैठकांमध्ये कोरोना संदर्भात मोठी चर्चा झाली असून, कोरोना संकटाचा सामना एकजूटीने कसा होईल, यावर चर्चा केली असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. तसंच नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही जावडेकर यांनी केलं आहे. मास्कबाबत जनजागृतीची गरज असल्याचंही ते म्हणाले. मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड असल्याचं जावडेकर म्हणाले.

जावडेकर म्हणाले, पुण्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित भागात अँटिजेन टेस्ट वाढविण्यात येणार आहे. मास्क न घालणार्‍या लोकांवर आणि कुठेही थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा गोष्टी टाळल्यास करोनाबाधित रुग्ण संख्येची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.

तसेच शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सहभागी करून घेणार आहे. पण यासाठी नागरिकांचा सहभाग असणे जरुरीचे असून केंद्र सरकार पुणेकर नागरिकाच्या कायम सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: