प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत, गोवा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

 

सध्या देशात महागाईने सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला असून इंधन दरवाढ हेच महागाईचे प्रमुख कारण आहे. विरोधकांकडून होणारी आंदोलने आणि जनतेचा राग लक्षात घेऊन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली. तसेच, उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडीही दिली. मात्र, आता, गोवा सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळत आहेत.

गोवा सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तताच सरकारने केली आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला गोवा सरकारने दिलासा दिल्यानंतर आता इतर राज्यातही मोफत गॅस सिलेंडरची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. नवीन आर्थिक वर्षापासून भाजपच्या जाहीरनाम्याीतल घोषणेनुसार नागरिकांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गोवा सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Team Global News Marathi: