राज्यात विविध पोलीस दलांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांकडून देखील पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस कर्मचारी भरतीसाठी केवळ ग्रॅज्युएट्सच नव्हे तर एमकॉम, एमएससी, एमबीए, बीई, बी.टेक झालेल्या हजारो तरुणांनी देखील अर्ज केल्याचे समोर आले आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी उमेदवारांच्या शिक्षणानिहाय केलेल्या वर्गवारीवरुन ही बाब समोर आली आहे.
उच्च प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना देखील सरकारी नोकरी खुणावत असल्याचे चित्र आहे. लोहमार्ग पोलिसांच्या कर्मचारी भरतीसाठी हजारो अर्ज आले आहेत. या अर्जांची त्यांच्या शिक्षणाानुसार छाननी करण्यात आली आहे. बारावी झालेल्या 3 हजार 846 तरुणांनी अर्ज केले आहेत. तर 3 हजार 136 ग्रॅज्युएट तरुण पोलीस भरतीसाठी दाखल झाले आहेत.
या भारतीता बी ए झालेले 1 हजार 847, बीकॉम झालेले 602, बीएस्सी झालेले 646, बीसीए / बीबीए / बीसीएस 75, बीई झालेले 70 आणि बीटेक झालेले 8 अर्ज दाखल झाले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या 345 तरुणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये एमए झालेल्या 193, बीकॉम झालेल्या 75 एमएससी झालेल्या 40 आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या 12 उमेदवारांचा समावेश आहे.