भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना ट्रोल केले जाऊ लागले आहे. ‘पंतप्रधान मोदी हे फक्त दोन तासच झोपत असून 22 तास काम करत आहेत, ते झोपच लागू नये याची साधना करत आहे’ असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नवीन विधान केले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दोन तासच झोपत असून २२ तास काम करत आहेत. आता ते झोपच लागू नये याची साधना करत आहेत. त्यांच्यावर जी देशाने गुंतवणूक केली आहे. ती वाया जाऊ देत नसून एक आणि एक मिनिटं ते कामासाठी वापरत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अलीकडेच त्यांनी 11 मार्चला भाजप सरकार येणार असा दावा केला होता. पण, तारीख उलटली मात्र काहीच होऊ शकले नाही.