पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांच्या या विधानावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट पवारांवर टीका केली होती.
पाटील ट्विट करून म्हणतायत की ३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर हे संजय राऊत शरद पवारांचा पर्याय दाखवत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावर ट्वीट करत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
“तुमच्या पासुन ते केव्हाच सावध झालेत. पवार साहेब काय आहेत हे एकदा मोदीजींना विचारा.(तुम्हाला भेटीचा वेळ दिला तरच) नाहीतर दिल्लीत तुमच्याच पक्षाची लोकं तुमची कशी खिल्ली उडवतात हे आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. तुम्हाला काही किंमत नाही इकडे..”, असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे.
“३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर हे संजय राऊत शरद पवारांचा पर्याय दाखवत आहेत. सत्तेचा मोह इतका वाढला आहे की, आपण धनुष्याच्या बाणात आहोत की घड्याळाच्या काट्यात याचाच यांना विसर पडला आहे. रोज सकाळी उठून शरद पवारांचं नामस्मरण सुरूच आहे. उद्धवजी, पुन्हा सांगतो,सावध राहा!”, असे ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता.