भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीडवर देवेंद्र फडणवीसांनी विशेष लक्ष केंद्रीय केलंय का याची राजकीय गोटात चर्चा सुरु झाली आहे.1 जानेवारीनंतर रविवारी 15 जानेवारीला देखील देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 1 जानेवारीला विनायक मेटेंच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. मात्र मुंडे भगिनी या कार्यक्रमात न दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली होती.
अशातच आता दोन आठवड्यामध्ये दोनदा फडणवीस हे बीडला येत आहेत. एक जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि उद्या गहिनीनाथ गडावर होणाऱ्या संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास ते हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे बीडला येणे टाळायचे. आता मात्र उलट पाहायला मिळत आहे फडणवीसांचा बीडकडचा ओढा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये तर्फन पुरस्काराला सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
तर दुसरीकडे मुंडे भगिनी मात्र फडणवीसांच्या यापूर्वीच्या कार्यक्रमाला गैरहजर होत्या. काल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या बीडमध्ये आल्या असतानाही प्रीतम मुंडे अथवा पंकजा मुंडे कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. उद्याच्या गहिनीनाथ गडाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्या तरी बीडच्या भाजपमध्ये सगळं काही आलबेल आहे असं म्हणणं थोडं घाईच ठरणार आहे.