नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसने त्यांच्या नावाने एबी फॉर्म भरला. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला. यावरून राजकीय वर्तुळात सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याच्या विविध चर्चा होत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही यावर मत मांडले आहे.
चव्हाण म्हणाले की, “पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणे गंभीर आहे.” असे ते म्हणाले. “सुधीर तांबे हे मूळ उमेदवार असताना त्यांनी नामांकनपत्र भरले नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंचे हे प्रकरण गंभीर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नामांकन फॉर्म कोरा दिला होता. मुलाची इच्छा होती तर त्याच्या नावानेही उमेदवारी दाखल करता आली असती;
मात्र उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल केली, ही गंभीर बाब आहे. बाळासाहेब थोरात यांना याविषयी माहिती असू शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दखल घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे पक्षाला एक जागा गमवावी लागत आहे. जे काही घडले त्यामध्ये पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे यातील सत्यता तपासावी लागेल.” असे अशोक चव्हाण म्हणाले.