मुंबई | भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर गंभीर आरोप करत असल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या यांच्यावरही महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. अशातच सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजीही करण्यात आली.
आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या पोस्टरबाजीमधून किरीट सोमय्या हे भाजप नेत्यांच्या चौकशी बद्दल का बोलत नाहीत, असा प्रश्नही विचारला होता. त्यातच काल पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांना तुम्ही आरोप करत असलेली लोक जर उद्या भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता त्यांनी चांगलाच संताप व्यक्त करत पत्रकारांना खडेबोल सुनावले होते.
किरीट सोमय्या यांनी संत पॉल कुठेही असेल तरी चौकशी व्हायला हवी असं उत्तर दिलं. यावरूनच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत दुखत्या नसेवर बोट ठेवल्यावर किरीट सोमय्याजी संतापणार नाही तर काय?, असं म्हणत किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका केली. सचिन सावंत यांनी मुखवटा हलल्यावर खरा चेहरा लपवण्याचा प्रयत्न होणारच, अशी टीका करत नौटंकी ही शेवटी नौटंकीच असते, असं किरीट सोमय्या यांना उद्देशून म्हटलं आहे.