आमचं उत्तर प्रदेशासोबत नातं आहे; संजय राऊतांचा योगिनां जोरदार टोला

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून सत्ताधारी भाजपाचे योगी आदित्यनाथ सरकार आणि विरोधकांमध्ये तुंबळ आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेनाही आज प्रचारात उतरली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. शिवसेनेचं उत्तर प्रदेशात काय काम आहे? असं अनेकजण विचारतात. पण, २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल तेव्हा त्यांना समजेल शिवसेनेचं काय काम होतं, असं राऊत म्हणाले. तसेच आमच्याकडे खूप हिंदी भाषिक लोक आहेत. महाराष्ट्रात जिथंही जातो तिथे जास्तीत जास्त लोक उत्तर प्रदेशातील लोक आहेत. आमचं उत्तर प्रदेशासोबत नातं आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी प्रचारसभेत सांगितलं.

आमचं राजकारण आधीपासून पारदर्शक आहे. आमच्या हातात हिंदूत्वाचा भगवा आहे. पण आमच्यासोबत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन सर्वच जाती-धर्माचे लोक आहेत. आम्ही देशहिताचं राजकारण करतोय. कोणाच्या हृदयात कोणाचं रक्त आहे हे १० मार्चला समजेल. तुमच्या रक्तात काय आहे? हे जनता ठरवणार आहे, असंही राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: