संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली होती. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.
आता यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस शोध घेतील. भारताबाहेर तपास करण्याचीही महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आहे. मात्र त्यासाठी पूनावाला यांनी कोणत्या क्रमांकावर धमकीचा फोन आला, कोणाकडून मिळाला याची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. धमकी देणारा कोणीही असला तरी कारवाई केली येईल, असं देसाई यांनी बोलुंन दाखविले आहे.
पुढे देसाई म्हणाले की, सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना करोना लसीसाठी धमकी मिळाल्यानंतर त्यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही चूक होऊ देणार नाही. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात येईल. सध्या पुनावाला परदेशात असल्याचे समजते. तसेच त्यांना त्यांच्या कोणत्या मोबाइल क्रमांकावर धमकी देण्यात आली याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना द्यावी. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत.