फक्त दोन राज्यात सत्ताबदल, शिवसेना खासदार संजय राऊतांचा एक्झिट पोल !

पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरीत कोणाची सत्ता येणार आणि कोणाला पराभवाची चव चाखावी लागणार याकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले आहे, सध्या सुरुवातीचे कल हाती येत असून पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी यांचा तृणमूल आघाडीवर आहे. तर आसाममध्ये भाजपा आपली सत्ता राखण्यात यश्वशी ठरेल अशी शक्यता आहे. केरळमध्येही सत्ताधारी डाव्यांनी मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना निकालाबद्दल त्यांचा अंदाज सांगितला आहे.

तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही. भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवे असा खोचक टोला त्यांनी लगावला.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखतील. भाजपच्या जागा वाढणार असल्यानं त्याचा फटका तृणमूलला बसेल. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होतील. पण तृणमूल काँग्रेसला आपली सत्ता राखण्यात यश येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केरळमध्ये डावे, तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल. पण तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सत्ताबदल होईल, असा अंदाज राऊत यांनी वर्तवला.

Team Global News Marathi: