आता…मशिदीच्या पायाभरणीला जाणार का? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले…

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी भूमिपूजन केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरासह अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी मशिदीच्या पायाभरणीबद्दलही स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले की या कार्यक्रमासाठी मला कुणीही बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही. त्यांनी सांगितले की जर ते मशिदीत गेले तर अनेकांची दुकाने बंद होतील.

एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान योगी आदित्यनाथांना विचारण्यात आले की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आपण सर्व धर्माच्या लोकांना आमंत्रित केले आणि ते कार्यक्रमात सामीलही झाले. पण असे म्हटले जात आहे की, येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा मशिदीची पायाभरणी होईल तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिथे जाणार नाहीत. यावर ते म्हणाले, ‘माझे जे काम आहे तेच मी करेन. बाकी ना मला तिथे बोलावले जाईल, ना मी तिथे जाईन.’ त्यांनी सांगितले की जर ते मशिदीत गेले तर अनेकांची दुकाने बंद होतील.

माझ्यासाठी भावूक आणि आनंदा-उत्साहाचा दिवस’

योगी म्हणाले, ‘राम मंदिर भूमिपूजन हा माझ्यासाठी भावूक, आनंदाचा, उत्साहाचा आणि गौरवाचाही क्षण होता. आनंद आणि उत्साहाचा यासाठी की सुरक्षा आणि इतर व्यवस्थांची संपूर्ण जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. मी गेल्या तीन वर्षांत हे काम खूप जवळून अनुभवले आहे. पक्षाने आणि पंतप्रधान मोदींनी जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. माझ्या गुरू परंपरेने हा संकल्प दशकांपूर्वी केला होता, जो आज साकार झाला आहे. त्या दिव्य आत्म्यांना यामुळे असीम शांती लाभली असेल. मंचावर जे महान व्यक्ती होते, ते सारेच रामजन्मभूमिशी खूप आत्मीयतेने जोडलेले आहेत. स्वाभाविकपणे आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंद आणि उत्साहाचा आहे.’

‘राम सर्वांचे आहेत’ या प्रियंकांच्या वक्तव्यावर बोलले योगी

यावेळी योगी आदित्यनाथांनी प्रियंका गांधींच्या ‘राम सर्वांचे आहेत’ या वक्तव्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की राम सर्वांचे आहेत हे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत. याआधीच ही सद्बुध्दी सर्वांना यायला हवी होती, पण तेव्हा काही लोकांच्या पूर्वजांनी रामललाच्या मूर्ती हटवण्याची कृती केली होती. ज्यांच्या पूर्वजांना अयोध्येत राम मंदिर नको होते ते कोण होते? आज जिथे गर्भगृहाचा शिलान्यास झाला तिथून 200 मीटर दूर शिलान्यास करावा असे 1989मध्ये म्हणणारे कोण होते? या विवादित परिसरात काहीही होणार नाही असे म्हणणारे कोण होते?

‘रामाच्या नावावर भेद पसरवण्याचे प्रयत्न चुकीचे’

‘कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे प्रोटोकॉलची काळजी घेताना या कार्यक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करता आले नाही. पण या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. राम सर्वांचे आहेत, त्यांच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे. रामाच्या नावावर लोकांमध्ये भेद पसरवण्याचे प्रयत्न कुणीही करू नयेत. आम्ही रामाच्या नावावर राजकारण केले नाही. ज्या निष्ठेने आम्ही 1984मध्ये जोडलेले होतो, त्याच निष्ठेने 2020मध्येही जोडलेले आहोत.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: