आता सर्व वाहनांसाठी ६ एअरबॅग्स अनिवार्य

आता सर्व वाहनांसाठी ६ एअरबॅग्स अनिवार्य

नवी दिल्ली : देशात उपयोगात येणा-या सर्वप्रकारच्या वाहनांमध्ये यापुढे सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवार दि. ३० मार्च रोजी येथे केली. सरकार सर्व वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत काँग्रेस खासदार केटीएस तुलसी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. गडकरी यांनी यावेळी सांगितले की, आता इकॉनॉमिक मॉडेलसाठीदेखील सहा एअरबॅग अनिवार्य असणार आहेत.

नितीन गडकरी यांनी सभागृहात सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने सरकारने ठरवून दिलेल्या सुरक्षा स्टँडर्ड्सनुसार तयार केली पाहिजेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतातील सुरक्षा स्टँडर्ड जागतिक स्टँडर्सच्या बरोबरीचे आहेत. तसेच भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात, त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो असे देखील त्यांनी सांगितले. देशात काही इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे अशा वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी, गडकरी यांनी प्रादेशिक अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्प संचालकांना चालू प्रकल्पांमध्ये योग्य रस्ते सुरक्षा उपायांची खात्री करण्यास सांगितले होते. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी संलग्न असलेल्या संसद सदस्यांच्या सल्लागार समितीची पहिली बैठक २४ मार्च रोजी झाली होती. ही बैठक रस्ते सुरक्षेशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. हा नियम लागू झाल्यानंतर रस्ते अपघातात होणा-या मृत्यूंच्या संख्येत घट होऊ शकेल, असा सरकारचा विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी वाहनात एअरबॅग असणे आवश्यक असणार आहे.

१ ऑक्टोबरपासून नियम लागू
नितीन गडकरी पुढे म्हणाले की १ ऑक्टोबर २०२२ पासून उत्पादित केलेल्या सर्व नवीन कारमध्ये स्टँडर्ड सुरक्षा म्हणून ६ एअरबॅग असणे अनिवार्य होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जानेवारी २०२२ मध्ये मसुदा अधिसूचनेला मंजुरी दिली होती. अधिसूचनेनुसार, ८ प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या आणि ३.५ टन (एम १ श्रेणीतील वाहने) पेक्षा कमी वजन असलेल्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य असतील. यापूर्वी १ जानेवारी २०२२ पासून सर्व वाहनांमध्ये ड्यूअल फ्रंट एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

गडकरींनी घेतली पहिल्या हायड्रोजन कारची चाचणी
पर्यायी इंधानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी बुधवारी संसदेमध्ये हायड्रोजनवर चालणा-या गाडीने आले. टोयोटा मिराई ही देशातील हायड्रोजनवर चालणारी पहिलीच गाडी आहे. भारतीय रस्त्यावर तसेच भारतीय हवामानामध्ये हायड्रोजनवर चालणा-या या गाड्या कशा प्रभावी ठरतील यासंदर्भातील चाचण्या सध्या सुरु आहेत. त्याचअंतर्गत ही गाडी तयार करण्यात आली आहे.

लवकरच देशात ग्रीन हायड्रोजनचे इंधन
आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचे प्रयोग करीत आहोत. हा हायड्रोजन पाण्यापासून तयार केला जातो, असे गडकरींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आता लवकरच आपल्या देशामध्ये ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरु होईल. त्यामुळे (इंधनाची) आयात कमी होईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील, असेही गडकरी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: