विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये अशांतता आहे. यावरून काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज आहेत. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामध्ये काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी तर थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.
माहितीनुसार, सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे पक्षावर नामुष्की आली असून सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोलेच पूर्णपणे जबाबदार आहेत. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपड करत आहे आणि ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे यावेळी आशिष देशमुख म्हणाले आहेत. तसेच, कॉंग्रेस महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करत नाहीत. गेल्यावेळी नागपूर विधानपरिषदेच्या जागेवर अगदी वेळेवर रवींद्र भोयर यांना बदलण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीदरम्यान काँग्रेसचे १० आमदार अनुपस्थित होते, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. म्हणूनच राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी तत्काळ प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज आहे, असे देशमुख म्हणाले आहेत. आता आशिष देशमुख यांच्या तक्रारीची मल्लिकार्जुन खर्गे काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे तसेच यावर पटोले काय विधान करतात हे सुद्धा पाहावे लागणार आहे