फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी १०० महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण

नवी दिल्ली: फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक प्रभावी १०० महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला आहे. या यादीत अमेरिकेच्या निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या आणि लवकरच उपराष्ट्राध्य म्हणून शपथ घेणार असलेल्या कमला हॅरिस  बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ, एचसीएल एंटरप्राइजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  रोशनी नाडर मल्होत्रा यांचाही समावेश आहे. (Nirmala Sitharaman in Forbes 2020 most powerful 100 women list)

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी १०० महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर कायम

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी १०० महिलांच्या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर कायम आहेत. सतराव्या वार्षिक फोर्ब्स पावर लिस्टमध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या यादीत ४१व्या स्थानावर आहेत तर एचसीएल एंटरप्राइजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडर मल्होत्रा ५५व्या स्थानावर आहेत. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यादीमध्ये ६८व्या स्थानावर आहेत. लँडमार्क समुहाच्या रेणुका जगतियानी यादीत ९८व्या स्थानावर आहेत.

मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर आणि युरोपच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती

फोर्ब्सच्या सतराव्या वार्षिक पावर लिस्टमध्ये सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर कायम आहेत. आर्थिक संकटात असताना मर्केल यांनी जर्मनीचे नेतृत्व हाती घेतले. त्यांनी जर्मनीची अर्थव्यवस्था सावरली. युरोपला मार्गदर्शन केले. मर्केल या जर्मनीच्या चॅन्सलर आहेत आणि युरोपच्या राजकारणाचेही नेतृत्व करत आहेत. सलग दहाव्या वर्षी त्यांनी ही कामगिरी चोख बजावल्यामुळेच त्यांचा समावेश फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत सलग दहाव्या वर्षीही पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध असूनही मर्केल यांनी जर्मनीत दहा लाख शरणार्थींना प्रवेश दिला. यानंतर युरोपमधील इतर देशांनीही मुस्लिम बहुल देशांमधील संघर्षांमुळे रस्त्यावर आलेल्या लाखो शरणार्थींना सामावून घेतले. मर्केल यांच्या सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर जर्मनीचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. अद्याप या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न फोर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी कोरोना संकटात देशाचे नेतृत्व समर्थपणे केले. तसेच लॉकडाऊन, क्वारंटाइन, कोरोना चाचण्या या संदर्भातले धोरण प्रभावीरित्या राबवले.

मेलिंडा गेट्स फोर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत पाचव्या स्थानावर

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहसंस्थापक मेलिंडा गेट्स (Melinda Gates) फोर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi, Speaker of the United States House of Representatives) यादीत सातव्या स्थानावर आहेत. फेसबुकच्या मुख्य संचालक शेरिल सँडेनबर्ग यादीत २२व्या स्थानावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यादीत ३९व्या स्थानावर आहेत. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यादीमध्ये ४६व्या स्थानावर आहे. प्रसिद्ध कलाकार रिहाना ६९व्या तर बेयोंसे ७२व्या स्थानावर आहे.

फोर्ब्सच्या यादीत ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी

फोर्ब्सच्या यादीत दहा देशांतील ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनोरंजन क्षेत्रातील पाच सदस्यांचा समावेश आहे. यादीत समावेश झालेल्या सर्व महिला २०२० मधील आव्हानांना ठामपणे सामोऱ्या गेल्या आणि त्यांचे निर्णय इतरांसाठी आदर्श ठरले.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष फोर्ब्सच्या यादीत ३७व्या स्थानावर

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन फोर्ब्सच्या यादीत ३७व्या स्थानावर आहेत. वेन यांनी तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या सुरू केल्या. याच कारणामुळे तैवान या २.३ कोटी लोकसंख्येच्या देशात आतापर्यंत कोरोनामुळे फक्त सात मृत्यू झाले.

यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत १७ महिलांचा पहिल्यांदाच समावेश

यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत १७ महिलांचा पहिल्यांदाच समावेश झाला. या महिलांच्या कोरोना काळातील कामाची दखल घेण्यात आली. अमेरिकेतील युनायटेड पार्सल सर्विसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरोल टोम फोर्ब्सच्या यादीत ११व्या स्थानावर आहेत. अमरिकेच्या क्लोरोक्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा रेंडले फोर्ब्सच्या यादीत ८७व्या स्थानावर आहेत. सीव्हीएस हेल्थच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि भावी मुख्य कार्यकारी अधिकारी करेन लिंच फोर्ब्सच्या यादीत ३८व्या स्थानावर आहे. अमेरिकेत २०२१ पासून सुरू होत असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेचे नियोजन त्या करत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: