मुंबई | कर्नाटक राज्यातील उडपी येथे काही शाळेत शिकणाऱ्या मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू पाहत होत्या,परंतु उडपी मधील त्या शाळेच्या प्राचार्यांनी त्या मुलींना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू दिला नव्हता.यावरून देशभर मोठ्या प्रमाणात वादंग उठला आहे. तसेच राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा वादंग निर्माण झाला होता.
या वादाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, गृहमंत्राच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’गृहमंत्र्यांनी हे शहाणपण आधी हा मुद्दा तापवणाऱ्या आपल्याच पक्षाला सांगावे. हिजाबचे समर्थन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबची परवानगी देणार आहे का? हेही राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारून घ्यावं’, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.