नामिबियाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक, डॉक्टर करतायत वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

 

नामिबियाहून आणलेल्या मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये साशाला किडनी संसर्ग झाला आहे. पाच वर्षीय साशावर भोपाळच्या पशुतज्ज्ञांकडून उपचार सुरु करण्यात आले आहे. नामिबियातून चार महिन्यांपूर्वी भारतात आणलेल्या आठ चित्त्यांपैकी ही एका मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, देशातून चित्ता नामशेष झाला त्याला 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता. या चित्त्याचे जतन करण्यासाठी त्यांना भारतात आणले होते.

साशा नावाची मादी चित्ता गेल्या काही दिवसांपासून थकलेली आणि अशक्त जाणवत होती. त्यामुळे तिला तात्काळ क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 8 चित्ते नामिबियाहून मध्यप्रदेशच्या कुनो अभयारण्यात आणण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटरचा प्रवास करुन 5 मादी आणि 3 नर असे एकूण 8 चित्ते भारतात दाखल झालेत. नामबियाहून स्पेशल चार्टर्ड कार्गो फ्लाईटनं या चित्त्यांना भारतात आणले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे फ्लाईट उतरवण्यात आले होते.

त्यानंतर मध्य प्रदेशातल्याच कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्या 8 चित्त्यांना सोडण्यात आले. चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविट आणि रानडुक्कर या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने आहेत. यासोबतच राजस्थानातील मुकंदरा डोंगर भागातला अधिवास चित्त्यांसाठी योग्य असल्याचं वन्यजीव तज्ज्ञांचं मत आहे.तर दुसरीकडे कुनो नॅशनलपार्कमधील अन्य चित्त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, साशाची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगण्यात आले आहे. साशासाठी भोपाळहून पशुतज्ज्ञांना बोलवण्यात आले असून त्यांना साशाला किडनीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तसेच, तिच्या शरीराचे डिहायड्रेशन झाल्याचेही वैद्यकिय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: