राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.’केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये’, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत उत्तर देताना केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यात आयकर, ईडी, एनआयए, सीबीआय असेल त्यांना देशातल्या कुठल्याही व्यक्तिची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार संविधान, घटना, कायदा, नियम यांनी दिलेला आहे.
त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करतं, त्या सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या तपास यंत्रणा मग सीआयडी असेल किंवा एसीबी असेल किंवा पोलीस विभाग असेल, या सगळ्या एजन्सीना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तर चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण, हे आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर काही राजकीय रंग आहे का, अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होते’, असं ते म्हणाले.
‘शेवटी कोणाची चौकशी झाली तर त्यांना उत्तर देणं, चौकशी करता जे संबंधित अधिकारी येतात त्यांना सहकार्य करणं हे हिंदुस्थानी नागरिक म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, त्याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही. पण, नाहक त्रास होता कामा नये’, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवरील कारवाईची आठवण देखील करून दिली आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांवर काही आरोप झाले पण नंतर जे आरोप केले गेले त्याला कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत, असं त्यांनी लक्षात आणून दिलं.