सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झाल्या आहेत.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मोर्चात सहभागी झालेले नागरिक घोषणा देखील देत आहेत. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे.
सदर मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. हा मोर्चा पुढे प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक चौकाचोकात पोलिसांचा ताफा तैनात होता. अशा मोर्चांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली.