मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट ‘या’ युवा नेत्याची घेणार मदत

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळल्याची चर्चा सध्या रंगली आहे. महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. आज माजी मंत्री आदित्य ठाकरे बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते लालूप्रसाद यादव यांचे पूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत.


आदित्य ठाकरे यांच्या या अनपेक्षित बिहार दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईत उत्तर भारतीय विशेषत: बिहारी नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बिहारी समाजाची मते आपल्याला मिळावीत, यासाठी आदित्य ठाकरे यांनी बिहारचा दौरा काढला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे तेजस्वी यादवांची मदत घेऊ शकतात. त्यांना प्रचाराला बोलावून उत्तर भारतीयांचे मतपरिवर्तन करत त्यांची मते आपल्याकडे वळवण्याची मोठी खेळी उद्धव ठाकरेंची असू शकते, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचे मत हे परिणामकारक ठरू शकते.

Team Global News Marathi: