मुंबई | महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा सोमवारी मुंबईच्या बीकेसी मैदानात पार पडली. या सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ‘देखो आपला महाराष्ट्र’ अशी जाहिरात केली आहे. या सरकारला मराठी भाषेचीही अडचण निर्माण झाली आहे का? मराठीत देखो म्हणतात का? पहा आपला महाराष्ट्र असा म्हणा ना? कुठल्या राज्यातून आला, देखो हा शब्द? आता यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे. आता यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा अजित पवार( यांनी शिंदे सरकारला दिला.
पुढे अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुसंक म्हटले. त्याची या सरकारला लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणे होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाहीती जबाबदारी पार न पाडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही टिपण्णी केली आहे. त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वाटत नाही का? मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही साडेबारा कोटी जनतेचे प्रमुख आहात. आपण शेवटी सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपलीही अशा गोष्टींमुळे शरमेने मान खाली जाते. परंतू नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल काही वाटत नाही.
मुख्यमंत्री अलीकडे अनेकदा चुकलेले मी पाहिलं आहे, तुम्हीही पाहिलं असेल. मागे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू देशाच्या पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नाही आणि मुख्यमंत्री बोलत आहेत. बोलत असताना घोटाळा करू नका. मात्र, हे घोटाळा करून मुख्यमंत्री झालेले आहेत. आपली ऐकी टिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन चार पावले मागे पुढे झाले पाहिजे. जिंकून येण्याची क्षमता हा उमेदवारीचा निकष असला पाहिजे. पण आपल्यातही जाणीवर्पूवक बातम्या पसरवल्या जातात. टिल्ली टिल्ली लोकही काहीही बोलत आहेत, असा टोमणाही पवार यांनी मारला.