राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढील कारवाई काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्यावर होणार असा दावा केला आहे. आता अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे असा इशाराच त्यांनी दिला.
मद्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात १५८ कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे तर आम्ही याआधी दिले होतेच. उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उद्धव ठाकरे यांची तर एवढी मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणं एवढंच या सरकारचं काम होतं. हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं. त्याची चौकशी सुरू झाली आहे.
तसेच हिसाब तर घेऊनच राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे असा थेट इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. सोमय्यांनी अस्लम शेख यांचं नाव घेतलं असलं तरी त्यांचा नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार? तसेच कोणत्या तपास यंत्रणेकडून त्यांची चौकशी होणार याबाबत किरीट सोमय्यांनी काहीही सांगितलं नाही. त्यामुळे याविषयीचं कुतुहूल निर्माण झालं आहे.